Search

ज्ञानसेतुचा मेघालय दौरा आणि साठवलेल्या अविस्मरणीय आठवणी

Updated: Jan 9


ज्ञानसेतु उपक्रमांतर्गत अनेक जण ईशान्य भारतात जाउन तिथल्या मुलाना विज्ञान शिकवतात. मेघालय राज्यातील काही शाळांमध्ये जाऊन शिकवण्याची संधी आम्हाला मिळाली. १६ मे २०१८ रोजी आमचा रेल्वेचा प्रवास सुरु झाला. मे महिन्याच्या सगळीकडून भाजून काढणाऱ्या उन्हामध्ये उत्तर प्रदेश, विदर्भाचा एक मोठा टप्पा पार पाडणे म्हणजे थोड धाड़सच होत. पण मनाची पूर्ण तयारी झाली असल्यामुळे त्याच काही वाटल नाही. खरी उत्सुकता होती तिथल्या गावात जाण्याची.

4 दिवसाच्या प्रवासानंतर शिलॉंगवरूण "मौबसेन" या रिभोई जिल्ह्यातील गावात जायचे होते. तेव्हा शंकर नावाचा एक दादा आम्हाला सोडायला आला होता. यांच्याशी गप्पा मारत आम्ही जवळपास ३ तास प्रवास केला अर्धा जिप्सी आणि अर्धा टॅक्सी. शहरातून गावात जाताना निसर्ग सौदर्याचा आनंद घेत आम्ही मौबसेन मधील एका छोट्याश्या टपरी पाशी उतरलो आणि खास आमच्यासाठी बनवलेल्या लाल चहा, पांढरा वाटाणा आणि हरभरे घातलेली एक भाजी, आणि विकत आणलेल्या पोळ्या खाल्ल्या. पोटपुजा करून लगेचच शाळेमध्ये जायला निघालो.

शंकर दादा आम्हाला शेम्बोक नावाच्या एका गावातील माणसाशी ओळख करुन देऊन परत गेला. त्यांनी आम्हाला शाळेत नेऊन शाळेतील टोनी सरांशी ओळख करून दिली. दुपारी १ ते ३ या वेळेत आम्हाला सत्र घ्यायचे होते. त्यात मुलाना हिंदी समजत नव्हत, त्यामुळे इंग्लिश मधून सत्र घेण आवश्यक होत. मनाची तयारी करुन आम्ही सत्र घेण्यासाठी वर्गात गेलो. नववी, दहावी मिळून एकूण २२ मुलमुली आमच्या पुढे बसली होती आणि मी टाळ्यांचा पाउस घेऊन सत्राची सुरुवात केली. मुलांनी त्याचा आनंद घेतलेला पाहुन छान वाटल. पुढे आमचे प्रयोग सुरु झाले. सगळे जण आनंद घेत होते आमच्या अपेक्षेपेक्षा सत्र बरच चांगल झाल होत. सत्र संपता संपता आम्ही stew tannat हा खासी शब्द शिकलो याचा अर्थ enjoy असा आहे. त्यामुळे रोज सत्र संपल की आम्ही तो शब्द वापरायचो. आम्हाला प्रवीणजीनी सांगितलेल तिथल्या मुलांशी लवकर जुळवून घेण्यासाठीच ते एक तंत्र होत.

सत्र संपल्यावर आम्हाला एका काकुनी चहा प्यायला बोलवल. त्यांच्या घरी लाल चहा आणि sweet potato म्हणजे रताळ खाऊन संध्याकाळचा नाश्ता केला. त्यांच्याशी इंग्लिश मधून गप्पा मारायचा एक वेगळाच अनुभव होता.त्याचं नाव काय होत माहित नाही पण इंग्लिश मधील madam या अर्थाने सगळे त्यांना मदाम अशी हाक मारत. शेम्बोकना ३ मूल होती त्यातल्या मोठ्या मुलाच नाव firstlyborn अस होत काऱण त्याचा जन्म पहिला झाला होता. ते ऐकून त्यांची नाव ठेवण्याची पद्धत फार मजेशीर वाटली.

टोनी सरांची इच्छा म्हणून आम्ही नववीच्या वर्गात गणित शिकवायचो आणि पुढचे २ दिवस सकाळचे जेवण स्वतः बनवून खाल्ले. त्यामुळे सकाळी लवकर उठायच आवरायच तयार होऊन शाळेत जायच सकाळी ९ ते १० गणित शिकवायच नंतर जेवण बनवायच, खायच. चुलीवर पोलपाट लाटण नसताना स्वयंपाक बनावयचा कसा, हा मोठा प्रश्न होता. मग आमच्या जवलील ज्ञानसेतुकडून प्रयोग करण्यासाठी दिलेल्या सामनात एक जवळपास ४ फुट लांब पाइप होता. त्या पाइपच लाटण आणि फुंकणी म्हणून वापर करुन आमच्या पोळ्या जेमतेमच बनल्या. साधारण २ तासात ८ पोळ्या आणि बोटही वेगवेगळ्या पद्धतीने भाजून झाली होती. यातच आम्हाला जेवण बनवताना तिथल्या मुलांनी बघितले त्यांनी याआधी पोळ्या कधीच पहिल्या नव्हत्या. त्यामुळे पोळ्या बनवायची आणि त्यापेक्षा जास्त खायची फ़ारच उत्सुकता त्यांना होती. मग त्यांना पोळ्या खाऊ घालण्याचा घाट शेवटच्या दिवशी घातला. सकाळी मुलांसाठी आणि संध्याकाळी मुलींसाठी मिळून जवळपास ७५ पोळ्या आम्ही लाटल्या. एकंदरीतच शेवटचा दिवस फार खास होता.

एका अनोळखी गावातले अनोळखी भाषिक लोकांसोबतचे ४ पूर्ण दिवस कसे गेले ते कळल सुद्धा नाही. तिथे जाताना काय असेल याचं कुतूहल होत मनात पण येताना भरपूर आठवणी आणि आनंद घेऊन चाललो होतो. मेघालयमधले ते ४ दिवस आमच्यासाठी नेहमीच अविस्मरणीय असतील. तिथल्या लोकांसोबत घालवलेले ते क्षण मनाच्या एका कोपऱ्यात कायम राहतील.आपला भारत खुप मोठा आहे आणि ईशान्य भारतच नव्हे तर आपल्या महाराष्ट्रात सुद्धा अशी अनेक ठिकाण आहेत की जिथल्या लोकांना आपली गरज आहे. हा भाव मनात जागवायचा असेल, खरा भारत पहायचा असेल तर घराची सुरक्षित चौकट सोडून थोडं धाडसी होत देशात फिरल पाहिजे. चला त्यांना आपल करण्यासाठी जमेल तसे प्रयत्न करूया.

-आभा


22 views0 comments