अजूनही मला आमच्या ओरिएंटेश प्रोग्रॅमची तारीख लक्षात आहे. 1 व 2 मे आणि तिसऱ्याच दिवशी आम्ही निघालो मणिपूरच्या प्रवासासाठी. आम्ही एकूण ७ लोक आणि मनिपुरला आम्हाला मार्ग दाखवणारी विना ताई मिळून ८ चा गट झालेला. पुढे आमचे आणखी 2 गट पडले आणि मी तमेनलोंगला आले.इथे घालवलेले ते ५ दिवस अगदी भुर्रकन निघून गेले पण आयुष्य कसे जगावे हे शिकवून गेले.
आपल्या पोटाची भूख मिटवायला आपण सगळे कष्ट करतो. त्यातच मग परिवाराचा विचार करतो. पण या गोष्टींच्या पलिकडे पाहण्याची दृष्टी फार कमी लोकांना लाभलीये. सध्या हे प्रमाण कमीच. खरा आनंद हा देण्यात दडला आहे, हे आपण विसरत चाललोय आणि त्याचबरोबर माणसाच्या गरजा देखील तशा वाढतच आहेत. मी माझा परिवार, नातेवाईक यापलिकडे एक जग असतं याची जाणीव माणिपूरच्या या प्रवासात मला झाली.
परत येताना जेव्हा ती मुलं म्हणायची की मिस कम बॅक सून.तेव्हा त्यांना आपल्याबद्दल वाटणारी आत्मीयता कळली. खरेतर तिथल्या मुलांमध्ये विविध गाष्टींचं कौतुहल खूप आहे. त्यांना खूप शिकायची इच्छा आहे पण अजूनही वाचनालय, ग्रंथालय, मैदान अश्या शिक्षण उपयोगी सुविधा त्यांपर्यंत पोहोचल्याचा नाहीत.
एकदा तेथील मुख्याध्यापक सरांच्या घरी जेवायचे निमंत्रण मिळालेले. जेवण होताच गाण्याच्या भेंड्याचा कार्यक्रम झाला. सर्वांनी खूप मजा केली. मराठी, हिंदी, इंग्रजी अशी सर्व गाणी गायली आणि एक मात्र कळले, की आपण सर्व सारखेच आहोत. माणसांनी आखलेल्या या सीमांमुळे आपण वेगळे झालोय. त्यांना भेटून हा अनुभव घ्यायलाच हवा, असे मला वाटते.
आपल्या सर्वांचे ध्येय एकच असत-आरामदायी जीवन. पण या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा असू शकतो आणि प्रवासात साठवलेले अनुभव हीच शिदोरी असते. आता या शिदोरीत कोणते अनुभव भरायचेय हे आपल्यावर आहे.
- मेघा
Comments